सातारा येथील बारव `जलदूत`ने केली पुनरुज्जीवित
औरंगाबाद शहराजवळ सातारा हे गाव प्रसिद्ध आहे. श्री खंडोबाचे येथे प्राचीन हेमाडपंती मंदिर असल्याने दरवर्षी मोठी यात्रा भरते. सातारा गाव आता शहराचाच भाग झाले आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांची संख्या वरचेवर वाढताना दिसते. या गावचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, इथे एक पुरातन बारव आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या या बारवेला ऐतिहासिक महत्त्व आहे. सातारा गाव महापालिकेच्या हद्दीत असले तरी येथे पाणीपुरवठ्याची कुठलीही ठोस व्यवस्था अद्यापही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीप्रश्नाला नेहमीच सामोरे जावे लागत असे. महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, पण त्यावर नागरिकांची तहान भागत नाही, अशी येथील एकंदरीत स्थिती.
साताऱ्यातील ही बारव गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होती. आसपासच्या नागरिकांनी टाकलेला कचरा, दगड-माती यामुळे ही बारव बुजत चालली होती. जुने पुरातन बांधकामही अनेक ठिकाणी ढासळले होते. या पुरातन वास्तूला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी `जलदूत` संस्थेने पुढाकार घेतला. या बारवेला जुन्या काळात पाणी होते, असे जुने जाणते नागरिक सांगत असत. आजच्या घडीला बारवेची झालेली ही अवस्था `जलदूत`चे किशोर शितोळे यांच्या मनाला पटली नाही. मग काय, `जलदूत`च्या टीमने ठरवले... आपणच या बारवेला पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचे...! किशोर शितोळे यांनी यासाठी गावातील युवकांना एकत्र केले. या सामाजिक कार्यात प्रत्येकाचा पुढाकार महत्वाचा आहे, ही गोष्ट त्यांनी नागरिकांना पटवून दिली. गावाचे काम म्हटल्यावर काय, सगळेच एकत्र आले. `जलदूत`ने गावाच्या भल्यासाठी घेतलेला पुढाकार नागरिकांनाही पटला. संपूर्ण काम करायचे तर त्यासाठी निधीही उभा राहायला हवा. त्यासाठी नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करण्याचा संकल्प केला. यात प्रत्येकाने आपापल्या ऐपतीनुसार रक्कम दिली. अनेकांनी वस्तुरूपानेही मदत केली. `जलदूत`चे किशोर शितोळे यांचा मूळचा पिंड अभियंत्याचा आहे. त्यांनी संपूर्ण कामाचा तांत्रिक आराखडा तयार केला. प्रत्येक काम नियोजनात्मक पद्धतीने व्हायला हवे, असा त्यांचा नेहमी आग्रह असतो.
बारव पुनरुज्जीवनाच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी रविवार निवडण्यात आला. जलदूतची टीम तर सज्ज होतीच, पण श्री. शितोळे यांनी या कामात गावातील युवाशक्तीलाही संघटित केले. अशाच एका रविवारच्या सकाळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. जलदूतचे नेतृत्व आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग, त्यांचे प्रत्यक्ष श्रमदान या माध्यमातून सातारा गावातील ही ऐतिहासिक बारव पुनरुज्जीवित झाली. भूगर्भातील संचित पाणी उपयोगात यावे, यासाठी जलदूतने आजवर अनेक कामे केली आहेत. पण साताऱ्याच्या कामाचे वैशिष्ट्य असे होते की, ही ऐतिहासिक बारव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली होती. तिच्याशी लोकांच्या भावना जुळलेल्या होत्या. त्यामुळे या बारवेचे पुनरुज्जीवन पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना विशेष आनंद झाला. उन्हाळ्याच्या दिवसात आणि पाणीटंचाईच्या कालावधीत ही बारव नागरिकांना फायदेशीर ठरू शकेल. एका ऐतिहासिक वास्तूला गतवैभव प्राप्त करून दिल्यामुळे `जलदूत` टीमच्या चेहऱ्यावर एक निराळाच आनंद झळकत होता. जलतज्ज्ञ किशोर शितोळे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सातारा भागात आणखी एक कामगिरी यशस्वी झाली.