डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे जलदूतने बांधलेला बंधारा
`जलदूत`च्या बंधाऱ्यामुळे विद्यापीठाचा वाचला खर्च. `जलदूत` या संस्थेद्वारे जलसंधारण क्षेत्रात आजवर मोठमोठी कामे झालेली आहेत. मुकुंदवाडी येथील बारवेचे काम, पैठण तालुक्यातील गिधाडा गावात जलदूतने बांधलेला बंधारा, सातारा इथल्या ऐतिहासिक बारवेचे पुनरुज्जीवन अशी अनेक कामे `जलदूत`ने पूर्ण केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात अनेक मोठमोठ्या वास्तू उभ्या आहेत. हा परिसर झाडेझुडपे आणि बागबगीच्यांनी समृद्ध आहे. उन्हाळ्यात मात्र येथे पाणी अपुरे पडत असे. चांगली हिरवीगार वाढलेली झाडे उन्हाळ्यात सुकून जात. उन्हाळ्यात जाणवणारा पाणीप्रश्न सोडवावा, या हेतूने `जलदूत`ची टीम पुढे सरसावली. विद्यापीठातील जलस्रोतांची पाहणी करून नवीन पद्धतीने हा प्रश्न सोडविता येईल का, यावर विचार सुरू झाला. `जलदूत`च्या टीमने विद्यापीठ परिसराची पाहणी केली. निसर्गतः मिळणाऱ्या पाण्याचा साठा करता येईल का, यावर विचार सुरू झाला. या भागातील जमिनीची स्थिती, तेथील उंच आणि सखल भूभाग याविषयी आराखडा तयार करण्यात आला. `जलदूत`चे प्रमुख किशोर शितोळे यांनी सर्व बाबींचा आढावा घेऊन विद्यापीठात फेरोसिमेंट तंत्राने बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी येणारा खर्चही `जलदूत`नेच उचलला.
श्री. शितोळे यांनी सर्वप्रथम विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संघटित केले. यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा प्रमुख सहभाग मिळाला. पहिल्याच पावसाळ्यात `जलदूत`तर्फे श्रमदानातून बांधण्यात आलेला हा बंधारा ओव्हरफ्लो झाला. जलदूतच्या टीमने रेनवॉटर हार्वेस्टिंग, बारवांचे पुनरुज्जीवन आदी कामांतून जलसंवर्धनाची चळवळ सुरू ठेवलेली आहे. विद्यापीठातील या बंधाऱ्यामुळे परिसरातील २ बोअरवेलला पाणी वाढले, तर दोन विहिरी आणि एका बारवेची पाणीपातळी वाढली. येथील नर्सरीसाठी दरवर्षी १२ ते १५ टँंकर पाणी विकत घ्यावे लागायचे, पण `जलदूत`च्या बंधाऱ्याचा फायदा झाला. त्यावर्षी विद्यापीठाला एकही टँकर पाणी विकत घ्यावे लागले नाही. हा बंधारा पाहण्यासाठी विद्यापीठ परिसरातील कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक आजही परिसरात येतात. जलतज्ज्ञ किशोर शितोळे यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जलसंधारणाचे महत्वपूर्ण काम पूर्ण केले. या बंधाऱ्यामुळे वृक्षसंवर्धनासाठी खूप फायदा झाला. `जलदूत`च्या या कामाबद्दल आजही आभार व्यक्त केले जातात.