मी पाहिलेला जलदूत
ही गोष्ट साधारण जुलै महिन्यातील असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठातील महर्षी शिंदे वसतिगृहात `जलदूत` राबवीत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होत होती.
विदयापीठातल्या विद्यार्थ्यांचे एक वैशिष्ट्च आहे, ते असे की, दुसऱ्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना एखादया कार्यक्रमाबद्दल किंवा उपक्रमाबद्दल काही सांगितले तर त्याची तयारी ते त्या उपक्रमाच्या आदल्या दिवसापासून करतात. याउलट स्थिती अशी की, विदयापीठातल्या विद्यार्थ्यांना एखाद्या कार्यक्रमाबद्दल सांगितले तर ते त्या कार्यक्रमाची तयारी पंधरा दिवस अगोदरपासून करतात. शारीरिक मजबुतीबरोबरच वैचारिक पातळीवरील गांभीर्य विदयापीठातील विद्यार्थ्यांमध्ये जाणवते. किशोरदादा शितोळे यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून `जलदूत` सेवाभावी संस्था साकारण्यात आली. फक्त एक टक्का फोटोसेशन आणि ९९ टक्के समाजकारण या सूत्रानुसार `जलदूत`चे कार्य चालते.
जुलै महिन्यातला तो रविवारचा दिवस (सर्वांच्या आवडीचा) होता. मुकुंदवाडी बारव येथील उपक्रमात सहभाग नोंदवायचा होता. दोन ते तीन दिवस आधीपासून याविषयी वसतिगृहात चर्चा सुरू होती. सूर्य उगवला. दिवस उजाडला. विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली. एकमेकांना फोन करून सर्व मंडळी एकत्र जमली. सर्वांनी अत्यंत दिमाखात अन् उत्साहात मुकुंदवाडीकडे जायला सुरवात केली. पाहता पाहता साठ ते सत्तर जण जमले. मुकुंदवाडीमधील प्राचीन बारव कचऱ्याने गच्च भरलेली होती. पाणीटंचाईच्या काळात या बारवेपासून मिळणारा फायदा परिसरातील लोकांना माहीत नव्हता. याबाबत लोकांमध्ये खरी जागरूकता निर्माण केली ती किशोरदादा शितोळे यांनी. काही वेळात सर्व विद्यार्थ्यांनी संपूर्ण बारव स्वच्छ केली. त्याचबरोबर सभोवतालच्या स्मशानभूमीत साफसफाई केली. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या माध्यमांनी या सामाजिक उपक्रमाची मोठ्या प्रमाणात दखल घेतली.
जवळपास सत्तर जणांनी `जलदूत`च्या माध्यमातून समाजसेवेचे जे कार्य केले, त्या कार्याचे मूल्य खरे पाहता खूप मोठे आहे. उद्याच्या भारताचे हे सामर्थ्यवान तरुण स्वत:बद्दल अधिक विचार न करता समाजहिताचा विचार सर्वाधिक करतात, याचा मला निश्चितच खूप अभिमान वाटतो. खऱ्या अर्थाने या दिवशी मी `जलदूत` पाहिला....``
``खरेच तुमच्या कार्यात
ईश्वराचा अंश आहे,
महापुरुषांच्या विचारांचा
तुमच्यात खरा वंश आहे....``
जय जलदूत….!